पप्पा

Posted by

मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली!

आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते पप्पा मनाने निर्मळ होते, त्यांनी आपले मत कोणावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना ते जमले नाही आणि त्यांना ते पटत ही नव्हते. दुसऱ्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ,ते मौन बाळगत पण कुणाला दुखवत नसत. समोरच्या व्यक्तीचा खरे-खोटेपणा त्यांना कळलाय, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. लहानपणी एक गोष्ट वाचली होती. एक हुशार माणुस देवळाबाहेरील आंधळ्याला रोज दुध म्हणुन पिठामध्ये पाणी घालुन द्यायचा. त्याला स्वत:च्या हुशारी वर खुप विश्वास होता. त्याला वाटत होते, ह्या आंधळ्याला कुठे माहित आहे दुध कसे असते. कमी पैशात मला मात्र दानाचे पुण्य मिळते आहे. पण तो हे विसरत होता की आंधळ्या माणसाला रंग दिसत नाही,चव कळते, स्पर्श कळतो, स्वर जाणवतो. असो, सुज्ञास सांगणे न लगे.

पप्पा मितभाषि होते, पण उत्तम चित्र काढत. वर्तमानपत्र वाचुन झाले की, त्यातील आवडलेल्या चित्रांचे रेखाटन करत, किंवा वळणदार अक्षरे घोटिवपणे परत परत लिहीत. त्यांना रोजनिशी लिहायची सवय होती. आणि प्रवासवर्णन तर खुपच छान लिहित. त्याच्या प्रवासवर्णनाचे एक छानसे संग्रहण होइल.

ते घरात फार कमी बोलत. म्हणुनच त्यांच्या मित्राने जेव्हा ऑफीसचा त्यांनी नाना पाटेकरला दिलेल्या बाणेदार उत्तरचा किस्सा सांगितल तेव्हा खुप आश्चर्य वाटले. खरे तर ते स्व:तबद्दल कधीच फुशारकीने बोलले नाही, आणि त्याचा हाच स्वभाव जास्त आम्हाला भावत होता.

पप्पानां वाचनाची खुप आवड. रहस्यमय कथा त्याच्या विशेषआवडिच्या. रत्नाकर मतकरींची पुस्तके तर ते बऱ्याच वेळा परत परत वाचत. पप्पाची आणि माझी मैत्री पुस्तकातर्फे होती.म्हणजे असे, ते दिवाळी अंक माझ्यासाठीराखुन ठेवत. खुप आवडलेला मजकुराचे पान मला वाचायला देत. वाचुन झाल्यावर त्याच्याकडे पाहिले की,खुसखुशीत मजकुरासाठी मंद हास्य दिसे. त्यांनी मलादिलेली ६-७ पुस्तके माझ्याजवळ त्याची आठवण म्हणुन सदैव राहतील.

त्यांना नाटक, सिनेमा ह्याची आवड तर होती. पण आश्चर्य म्हणजे अंताक्षरी मध्ये त्यानी एकदा कुणाला न आठवणारे मराठी गाणे सुचवून त्यांच्या उमद्या मनाचे दर्शन आम्हाला दिले होते. आठवणी तर खुप आहेत. पण आत्ता जितक्या दाटीवाटिने मनात आहेत, तितक्या झरझर त्या कागदावर उतरत नाही आहेत.

म्रुत्यु कुणाला चुकला नाही, पण प्रत्येकाच्या मनात भय असते, कि तो कसा येणार . स्व:तला , दुसऱ्या ला त्रास होऊन जाणे कोणाला नको असते. म्हणूनच पप्पा भाग्यवान ठरले. सर्व सामान्यपणे इस्पिताळातील कामकाजाच्या पद्धती प्रमाणे त्यांची जाण्याची वेळ नीट नाही कळवली गेली . पण ते ज्यावेळी गेले तेव्हा मी तिथे होतॆ. पण मला ते इतके शांत वाटत होते, कि ते गेले ह्याबर अजून विश्वास नाही बसत नाही . त्याच्या चेहर्यावरचे शांत भाव आठवून अजून अश्रु थांबत नाहीत देव त्यांच्या आत्म्यांस शांती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *